Menu

करियर
‘नीट’साठी शालेय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे धडे

nobanner

अवघ्या दोन महिन्यांत नीट या तुलनेत अवघड असलेल्या केंद्रीय प्रवेश परीक्षेला राज्यातील एमबीबीएस-बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सुमारे पावणेदोन लाख प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार असल्याने शालेय शिक्षण विभागाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मदतीने राज्यातील विद्यार्थ्यांकरिता नीटच्या अभ्यासाचे धडे देण्याचे ठरविले आहे.
नीट ही केंद्रीय परीक्षा राज्यातील विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याकरिता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. मात्र दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांना नीटकरिता तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
यापैकी एक समिती नीट या परीक्षेचे स्वरूप, नेमके काय काय शिकवायचे, कशावर भर द्यायचा हे ठरविणार आहे. यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकारी डॉ. सुधीर व्यास यांचा समावेश असेल. तर दुसरी समिती शालेय शिक्षण सचिव नंदकुमार आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. ही समिती नीटवर आधारित मागदर्शनपर व्याख्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेळापत्रक तयार करेल.

हे तर सरकारचेच पातक
सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली नीट रद्द केल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने दूरदृष्टी दाखवीत नीटच्या धर्तीवरच ‘एमएचटी-सीईटी’ या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेचे स्वरूप भविष्याच्या दृष्टीने बदलण्याचे ठरविले होते. परंतु अभ्यासक्रमही कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१५ मध्ये घेतल्याने विद्यार्थ्यांना मुळापासून नीटचा अभ्यास करावा लागणार आहे. अर्थात विद्यार्थी-पालकांच्या दबावाला झुकून, सवंग लोकप्रियता मिळविण्याच्या नादात वैद्यकीय शिक्षण विभागाने घूमजाव केले नसते तर कदाचित राज्यातील विद्यार्थ्यांना आता नीटचा जाच वाटला नसता.

-