Menu

राजनीति
60 आमदार सोडून गेले तेव्हा एकट्याने साथ दिली : शरद पवार

nobanner

”एक काळ होता ज्यावेळी 60 आमदार पक्षाची साथ सोडून गेले होते. पक्ष मोठ्या अडचणीत आला होता. हे संपूर्ण पुन्हा उभं करायचं ठरवलं आणि राज्यव्यापी दौरा आखला. सर्व दौऱ्यांचं नियोजन हे दिलीप वळसे पाटील यांनी केलं होतं”, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आज मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवार बोलत होते.

”दिलीप वळसे पाटील यांच्या कार्याचा गौरव कार्यक्रम होत असल्याचा आनंद आहे. या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित राहताना मला त्यांच्या वडिलांची आठवण येत आहे. दिलीप यांचे वडील दत्तू पाटील हे एक निराळं व्यक्तीमत्त्व होतं. आम्ही दोघेही एकच वेळी विधिमंडळात निवडून गेलो होतो. आमची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली”, असं शरद पवार म्हणाले.

”दत्तू पाटील यांनी आंबेगाव आणि त्या संपूर्ण परिसरासाठी प्रचंड कष्ट घेतले. ज्यावेळी दत्तू पाटील दिलीप वळसे पाटील यांना माझ्याकडे घेऊन आले तेव्हा दिलीप यांनी माझ्यासोबत काम करण्याची इच्छा प्रकट केली”, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

”एक काळ होता ज्यावेळी 60 आमदार पक्षाची साथ सोडून गेले होते. पक्ष मोठ्या अडचणीत आला होता. हे संपूर्ण पुन्हा उभं करण्याचे आम्ही ठरवलं. त्यासाठी आम्ही संपूर्ण राज्याचा दौरा आखला. माझ्या सर्व दौऱ्याचं नियोजन हे दिलीप वळसे पाटील करायचे. आमच्या प्रयत्नांना यश आलं आणि पुन्हा आमच्या पक्षाची सत्ता आली. राज्याची जबाबदारी पुन्हा माझ्यावर आली होती. मला वाटलं की दिलीप यांना मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात काम करायला आवडेल. पण त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबई सोडली आणि मतदारसंघात काम करण्यास सुरूवात केली ती आजपर्यंत सुरुच आहे”, अशी आठवणही शरद पवारांनी सांगितली.

”दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात त्यांनी एक उच्चस्तराचा विकास केला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या कार्याबाबत अभिमान वाटतो आणि आनंदही होतो. त्यांचा हा प्रवास असाच चालू राहो”, अशा शुभेच्छाही शरद पवार यांनी दिल्या.