Menu

खेल
यो-यो टेस्ट पास करणाऱ्यालाच टीम इंडियात स्थान-रवी शास्त्री

nobanner

टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी यो-यो टेस्टला पाठिंबा देत ही टेस्ट देणाऱ्यालाच टीम इंडियात स्थान मिळेल अशी भूमिका घेतली आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी भारतीय संघात निवड होण्यासाठी यो-यो चाचणी सक्तीची असल्याबाबत टीका केली होती. मात्र टीम इंडियचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अगदी विरोधी भूमिका घेत या टेस्टला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. ब्रिटन दौऱ्यावर रवाना होण्याआधी त्यांनी ही बाब निक्षून सांगितली. तुमच्यात क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे हे मी जाणतो, मात्र तुम्ही फिट राहिलात तर तुमचा खेळ बहरेल यात काहीही शंका नाही. यो-यो चाचणीत फिटनेसवरच भर दिला आहे. ही चाचणी पास करणे फारसे महत्त्वाचे नाही असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी तो गैरसमज मनातून काढून टाकावा असे म्हणत या टेस्टकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या खेळाडूंचे शास्त्री यांनी कान टोचले आहेत.

प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या या निर्णयाकडे भावनिक होऊन न पाहता कठोर निर्णय म्हणून पाहिले गेले पाहिजे अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने दिली आहे. आपले म्हणणे अधोरेखित करण्यासाठी विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे उदाहरण दिले. मागील कसोटीच्या वेळी शेवटच्या टप्प्यात बुमराह १४४ किमी प्रति तासाने गोलंदाजी करत होता, फिटनेसचा कस लागतो तो असाच. तुमच्या आजूबाजूला असणारे लोक फिट असतात, तुमच्याकडून त्यांना चांगल्या खेळाची अपेक्षा असते. चांगला खेळ तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही फिट असाल. अंबाती रायडू यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरल्यावर त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. यावरून संदीप पाटील यांनी या यो-यो टेस्टबाबत आक्षेप घेत विरोध दर्शवला होता. मात्र रवी शास्त्री यांनी यो-यो पास करा तरच संघात स्थान मिळेल असे ठणकावून सांगितले आहे.