Menu

खेल
आयएसएलचे यशापयश..

nobanner

भारतीय फुटबॉलमध्ये व्यावसायिकता आणण्याच्या दृष्टीने चार वर्षांपूर्वी इंडियन सुपर लीगची (आयएसएल) स्थापना करण्यात आली. इंडियन सुपर लीगमुळे भारतीय फुटबॉलचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली. त्यातच दीड वर्षांपूर्वी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय फुटबॉलला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. त्यातुलनेत फुटबॉलची लोकप्रियता तुटपुंजीच म्हणावी लागेल. कारण फुटबॉल हा खेळ दोशातील मोजक्याच भागापुरता मर्यादित राहिला आहे. आता आयएसएलच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने आयएसएलच्या यशापयशाचा केलेला हा ऊहापोह.

आयपीएल आणि प्रो-कबड्डी यांसारख्या लीग भारतात तुफान यशस्वी झाल्यानंतर आयएमजी रिलायन्स आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) यांनी इंडियन सुपर लीगची मोर्चेबांधणी केली. त्यातच देशातील आय-लीग या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे तीनतेरा वाजलेले असताना इंग्लिश प्रीमिअर लीग आणि स्पॅनिश लीग यांच्या धर्तीवर खेळवली जाणारी आयएसएल कितपत यशस्वी होईल, याचा अंदाज कुणालाही नव्हता. पहिल्याच वर्षी खेळाडूंना विकत घेताना केलेला अवास्तव खर्च, पायाभूत सोयीसुविधा यांमुळे आयोजकांना १०० कोटींचे तर सहभागी असणाऱ्या आठ संघांना प्रत्येकी २५ कोटींचे नुकसान झाले. पण खच्चाखच भरलेली स्टेडियम्स आणि स्पर्धेला मिळालेली लोकप्रियता यामुळे आयोजकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण चार वर्षांनंतरही फ्रँचायझींना फायदा-तोटय़ाचे गणित अद्याप सोडवता आलेले नाही. कारण चार वर्षांनंतरही मोसमागणिक होणारा तोटा काही टक्क्य़ांनीच कमी झाला आहे.

भारतात पायाभूत सोयीसुविधांची वानवा आहे, हे वास्तव आहे. १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने देशातील अनेक स्टेडियम्स चकाचक करण्यात आली. त्यामुळे स्टेडियम्सच्या देखभालीवर कोटय़वधी रुपये अद्यापही खर्च करावे लागत आहेत. त्यातच जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा आणि सरावासाठी मैदाने यांची वानवा अद्यापही आहे. देशातील पायाभूत  सोयीसुविधांमुळेच जगातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी आयएसएलकडे पाठ फिरवली आहे. जगातील बहुतांशी फुटबॉल क्लबकडे स्वत:चे स्टेडियम्स आणि सरावासाठी स्वत:च्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. भारतात हे चित्र दिसण्यासाठी अनेक वर्षे लागतील. सध्या अनेक क्लब्सना घरच्या सामन्यांसाठी स्टेडियम्स भाडय़ाने घ्यावी लागत आहेत.

एक-दोन दिवसाच्या अंतराने होणारे सामने, त्यासाठी करावा लागणारा प्रवास, सराव यामुळे परदेशातील मोतब्बर खेळाडूंनी आयएसएलला नापसंती दर्शवली आहे. कालू उचे, टिम काहिल, मिकू, मॅन्यूएल लांझारोटे यांसारखे नावाजलेले फुटबॉलपटू या वर्षी आपला जलवा दाखवणार असले तरी मोठय़ा खेळाडूंची वानवा जाणवत आहे. पहिल्या तीन मोसमात झिको, डेल पिएरो, मार्को माटेराझी आणि लुइस गार्सिया यांसारखे दिग्गज खेळाडू खेळले होते. त्यामुळे आयएसएलची लोकप्रियता वाढवायची असल्यास, फ्रँचायझींना मोठय़ा खेळाडूंना करारबद्ध करण्यावर भर द्यावा लागणार आहे. गेल्या वर्षी तब्बल चार महिने ही स्पर्धा रंगली, पण ते सूत्र भारतीय प्रेक्षकांसाठी फारसे पचनी पडले नाही. खेळाडूंच्या दुखापती, गोलशून्य होणाऱ्या लढती आणि बऱ्याच दिवसांनी होणारे सामने यामुळे आयएसएलसाठी भारतीय प्रेक्षक अनुत्सुक दिसले. या वर्षीपासून तब्बल सहा महिने ही स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे टी-२० प्रमाणे झटपट निकालाची अपेक्षा बाळगणाऱ्या भारतीय प्रेक्षकांना आता सहा महिने रंगणारी ही स्पर्धा कितपत पचनी पडते, हे येणारा काळच ठरवेल.

कोलकाता, बंगळूरु, चेन्नई, गोवा, केरळ अशा मोजक्याच शहरांत फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. त्यामुळे या ठिकाणी रंगणाऱ्या सामन्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. दिल्ली डायनामोस, पुणे एफसी, मुंबई सिटी एफसी या संघांना मिळणारा प्रेक्षकांचा पाठिंबा हा अत्यल्पच आहे. त्यामुळे देशात फुटबॉल संस्कृती रुजवायची असेल तर देशाच्या कानाकोपऱ्यात फक्त आयएसएलच नव्हे तर अन्य स्पर्धाचे आयोजनही मोठय़ा प्रमाणात व्हायला हवे.

प्रत्येक संघांनी अवास्तव खर्च टाळण्यासाठी गेल्या वर्षीच्याच खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. गेल्या वर्षीच्या उपविजेत्या बंगळूरु एफसीने १२ खेळाडूंना कायम ठेवत आपल्या दुसऱ्या संघातील पाच खेळाडूंना यावर्षी सीनियर संघात बढती दिली आहे. विजेत्या चेन्नईयन एफसीने १२, एफसी गोवा आणि एफसी पुणे सिटीने प्रत्येकी १३, दिल्ली डायनामोसने ११ तर जमशेदपूर एफसीने १० खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. परदेशी खेळाडूंवर जास्त खर्च न करता भारतीय फुटबॉलपटूंना करारबद्ध करत फ्रँचायझींनी आपले बजेट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता सहा महिने रंगणाऱ्या या स्पर्धेला भारतीय प्रेक्षक किती डोक्यावर घेतात, हे अंतिम सामन्यानंतरच स्पष्ट होईल.