Menu

खेल
धोनीच्या वन-डे संघातील जागेवरुन वाचकांच्या संमिश्र प्रतिक्रीया

nobanner

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतासाठी वन-डे व टी-20 क्रिकेट खेळणं पसंत केलं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये धोनीची फलंदाजीतली कामगिरी कमालीची ढासळलेली आहे. धोनीने यंदाच्या वर्षात आतापर्यंत केवळ 15 वन-डे आणि 7 टी-20 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये धोनीला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नव्हती. यानंतर अनेक माजी खेळाडूंनी धोनीऐवजी इतर तरुण खेळाडूंना वन-डे संघात जागा देण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकरने धोनीच्या जागी ऋषभ पंतला वन-डे संघात जागा देण्याची मागणी केली होती.

अजित आगरकरने केलेल्या मागणीवरुन लोकसत्ता ऑनलाईनने आपल्या वाचकांची मत घेतली. अंदाजे एक दिवसात मिळालेल्या मतांवरुन धोनीला वन-डे संघात जागा मिळावी की नाही यावरुन वाचकांच्या संमिश्र प्रतिक्रीया पहायला मिळत आहेत. फेसबूकवर तेराशी लोकांनी आपली मतं नोंदवली असून 55 टक्के लोकांनी अजित आगरकरच्या मताशी नापसंती दर्शवत धोनीला पाठींबा दिला आहे, तर 45 टक्के लोक धोनीऐवजी पंतला संघात जागा द्यावी यासाठी आग्रही आहेत.

दुसरीकडे ट्विटरवरमात्र काहीशा वेगळ्या प्रतिक्रीया पहायला मिळाल्या आहेत. एका दिवसात अंदाजे 402 लोकांनी आपली मतं नोंदवली. ज्यामध्ये 52 टक्के लोकांनी धोनीऐवजी पंतला संघात जागा द्यावी या मताला आपला पाठींबा दर्शवला असून 48 टक्के लोकं आगरकरच्या मताशी सहमत नाहीयेत.

आशिया चषकानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे व टी-20 मालिका खेळणार आहे. मात्र आगामी विश्वचषकाचा विचार केला असता, बीसीसीआय प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत भारतीय संघात धोनीला स्थान मिळतं की ऋषभ पंत कसोटी पाठोपाठ वन-डे क्रिकेटमध्येही पदार्पण करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.