Menu

अपराध समाचार
लाचखोरी प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक

nobanner

गुजरातमध्ये काँग्रेस आमदार पुरुषोत्तम साबरिया यांना रविवारी मोरबी पोलिसांनी अटक केली आहे. मोरबी जिल्ह्यातील टँकर आणि सिंचन योजनांच्या दुरुस्ती आणि पुनर्निमाणाशी निगडीत एका घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. धंग्रधढ येथील आमदार सावरिया यांनी गुजरात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित न करण्याच्या बदल्यात मुख्य आरोपीकडून ४० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यापूर्वी आमदाराने १० लाख रुपये घेतले होते. दरम्यान, काँग्रेसने हा आरोप फेटाळला असून घोटाळ्यात सहभागी असलेल्या भाजपाच्या मोठ्या नेत्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी साबरिया यांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

मोरबी पोलिसांच्या एकर पथकाने रविवारी पहाटे चारच्या सुमारास त्राजपूर गावातील निवासस्थानावरुन साबरिया यांना ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी त्यांना मोरबी शहरात आणले होते. दीर्घ चौकशीनंतर त्यांना औपचारिकरित्या ३ वाजता पोलिसांनी अटक केली.

मोरबीचे पोलीस अधीक्षक करणराज वाघेला म्हणाले की, आमदारांना दुरुस्ती आणि पुनर्निमाणाच्या कामातील अनियमिततेबाबत समजले होते. त्यांनी घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांकडून ४० लाख रुपये मागितले होते. आपले सहकारी भारत गणेशिया यांच्या माध्यमातून आमदारांनी हे पैसे मागितले होते. ३५ लाख रुपयांमध्ये तडजोड झाली होती. मुख्य आरोपी आणि प्रतिनिधींकडून (ज्यांना कंत्राट देण्यात आले होते) १० लाख रुपये स्वीकारले होते. उर्वरित रक्कम त्यांनी धनादेशाने स्वीकारले होते.