Menu

देश
फटाक्यांचा आवाज घटला

nobanner

न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी वेळेची घातलेली बंधने व जनजागृतीमुळे दिवाळीतील पहिल्या दोन दिवसांत नवी मुंबईतही फटक्यांचा आवाज घटला असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवाज क्षीण झाला असून अद्याप एकही गुन्हा दाखल झाला नाही. दिवाळीनंतर पोलिसांच्या अहवालानुसारच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वीच सर्वाच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याच्या वेळांवर नियंत्रण आणत फक्त रात्री ८ ते १० या दोन तासांची वेळ निश्चित केली होती. त्यामुळे फटाके खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. तसेच फटाक्याच्या प्रदूषणाबाबत व आवाजाच्या तीव्रतेबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. नवी मुंबई पोलीस व प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ ते १० या वेळांव्यतिरिक्त फटाके वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले होते.

नवी मुंबई शहरात पहिल्या दोन दिवसांत फटाक्यांचा आवाज एकदम क्षीण झाला असून वायू प्रदूषणाचे प्रमाणही कमी झाल्याचा अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला आहे. आवाज व हवेच्या प्रदूषणाचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये दिले आहेत.

न्यायालयाने फटाके वाजवण्याच्या वेळा निश्चित केल्या; परंतु निश्चित नियमावली दिली नाही. मात्र  जनजागृती झाल्याने पहिल्या दोन दिवसांत आवाज कमी आहे; परंतु लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळचे नमुनेही तपासण्यात येत आहेत.

– सुमैरा अब्दुल अली, आवाज फाऊंडेशन

नवी मुंबई शहरात फटाक्यांचा आवाज कमी जाणवला आहे. पोलीस ठाण्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु अद्याप एकही गुन्हा दाखल झाला नाही. ध्वनी प्रदूषण नक्कीच कमी आहे. वायू प्रदूषणाबाबतही नमुने तपासण्यात येत आहेत.

– डॉ. अनंत हर्षवर्धन अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

तीन वर्षांपासून फटाका खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. शाळांमधूनही मुलांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही शपथ देतो. त्यामुळे फटाके वाजण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुलांमध्येही जागरूकता झाली आहे.