Menu

देश
मुंबईत १८ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; नराधम परदेशात पसार ?

nobanner

नालासोपारा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली असून पीडित तरुणीला मानसिक आजार असल्याने आरोपींचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. बलात्कार कुठे झाला, ते ठिकाणच पीडितेला सांगता आलेले नाही. यामुळे हा गुन्हा तीन पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य संशयित हा परदेशात पळून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

नालासोपारा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीचे १० ऑक्टोबर रोजी बहिणीशी भांडण झाले. पीडित तरुणीला मानसिक आजाराने ग्रासले असून भांडणानंतर ती घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती घरी परतली. घरी आल्यानंतर तिने पोटदुखीची तक्रार केली. शेवटी वडील आणि बहिणीने तिला स्थानिक रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला पीडित तरुणी वांद्रे येथे गेली असावी, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. पीडित तरुणीचे कुटुंबीय आधी वांद्रे येथे वास्तव्यास होते.

यानुसार हा गुन्हा वांद्रे येथे वर्ग करण्यात आला. निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. निर्मल नगर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता पीडित मुलीने समुद्र, जुहू असा उल्लेख केला. पोलीस पीडितेला घेऊन वरळी भागात जाऊन आले. पण, ठोस माहिती मिळत नव्हती. मात्र, संशयित आरोपी हा ताडदेवचा रहिवासी असल्याचे लक्षात आल्यानंतर हा गुन्हा ताडदेव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

मुख्य आरोपी परदेशात पसार ?
पीडित तरुणीकडे कागदाच्या तुकड्यावर लिहिलेला एक मोबाईल नंबर सापडला आहे. हा मोबाईल नंबर ताडदेवमधील तरुणाचा असून तोच या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. मात्र, हा नंबर गुन्हा घडल्यापासून बंद आहे. मोबाईल नंबरधारकाचा पोलिसांनी शोधही घेतला. पोलिसांचे एक पथक बिहारमध्येही जाऊन आले. मात्र, संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला नाही. तो परदेशात पळून गेला असावा, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.