Menu

अपराध समाचार
वयोवृद्ध पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अटक

nobanner

दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या वयोवृद्ध पतीचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्येचा बनाव केला आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीविरूध्द पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे गेल्या २२ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. न्यायवैद्यक तपासणीनंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. पत्नीला अटक झाली असून तिला तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

सोमलिंग दोडप्पा डोगे (वय ६५) असे खून झालेल्या वयोवृध्दाचे नाव आहे. त्याची पत्नी कुसुम दोडे (वय ५८) हिनेच हे कृत्य केल्याचे उजेडात आल्यानंतर तिच्याविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिला अटकही झाली आहे. गेल्या २२ ऑक्टोबर रोजी हत्तूर गावात स्वत:च्या घरात सोमलिंग दोडे याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांत नोंद झाली होती. त्यानुसार अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास हाती घेतला होता. दरम्यान, मृत सोमलिंग याच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी केली असता त्यात हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडल्याच्या जखमा आढळून आल्या होत्या. गळा दाबून श्वास गुदमरून अनैसर्गिक मृत्यू झाल्याचा अहवाल छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागातून प्राप्त झाल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.

यासंदर्भात पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत सोमलिंग याच्या त्रासाला वैतागून पत्नी कुसुम हिने त्याचा गळा दाबून खून केल्याचा ठपका ठेवला आहे. गळा दाबून पतीचा खून केल्यानंतर तिने इतर अज्ञात आरोपीच्या मदतीने मृताच्या गळ्याला दोरी बांधून छताला लटकावून दारूच्या नशेत सोमलिंग याने स्वत: आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.