Menu

देश
श्रीरामाचा भव्य पुतळाच ठरणार अयोध्येची ओळख-योगी आदित्यनाथ

nobanner

प्रभू श्रीरामचंद्रांचा पुतळा अयोध्येची खरी ओळख ठरणार आहे. त्यामुळे श्रीरामाचा पुतळा दर्शनीय भागात उभारण्यात येईल यासाठी जागा कोणती निवडायची याची चर्चा आम्ही करतो आहोत. पूजेसाठी श्रीरामाची जी मूर्ती असेल ती वेगळी असेल. मात्र श्रीरामाचा एक असा पुतळा उभारला जाईल जो अयोध्येची ओळख ठरेल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. काही वेळापूर्वीच पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभारला जाईल असे स्पष्ट केले आहे

राम मंदिरावरून सध्या देशातलं राजकारण ढवळून निघताना दिसतं आहे. राम मंदिरप्रश्नी सुप्रीम कोर्ट जानेवारीत निर्णय देऊ शकते. मात्र राम मंदिर झालेच पाहिजे अशी मागणी सगळ्याच स्तरांतून होते आहे. अशात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामाचा पुतळा अयोध्येत उभारला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठीची जागा निश्चित व्हायची आहे हे त्यांनी सांगितले असले तरीही शरयू नदीच्या काठावर हा पुतळा उभारला जाण्याची शक्यता आहे. तसेच या भव्य पुतळ्याचे काम शिल्पकार राम सुतार यांनाच दिले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी यासंबंधी योगी आदित्यनाथ यांनी चर्चा केल्याचेही समजते आहे.

काय आहे ही योजना?
अयोध्येतील शरयू नदीच्या किनाऱ्यावर श्रीरामाचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. सीएसआरद्वारे या पुतळ्यासाठी निधी गोळा केला जाईल. श्रीरामाच्या पुतळ्यासह या ठिकाणी नवी अयोध्या वसवण्याचाही योगी आदित्यनाथ यांचा मानस आहे. त्याचबरोबर सेव्हन डी तंत्रातील रामलीला, रामकथा सांगणारी एक गॅलरी, म्युझिकल फाऊंटन हेदेखील या योजनेचाच एक भाग आहेत असे समजते आहे.