Menu

अपराध समाचार
आश्रमशाळेत मुलींवर अमानुष अत्याचार, गुप्तांगात मिरची पावडर टाकून करण्यात आली मारहाण

nobanner

दिल्लीमधील आश्रमशाळेत मुलींवर अमानुष अत्याचार करण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिल्ली महिला आयोगाने दिली आहे. द्वारका परिसरात ही आश्रमशाळा आहे. गुरुवारी आश्रमशाळेची पाहणी करत असताना महिला आयोगाच्या सदस्यांनी आश्रमशाळेत राहत असलेल्या सहा ते 15 वयोगटातील मुलींशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आश्रमशाळेतील काही मुलींनी महिला स्टाफने शिक्षा म्हणून गुप्तांगात मिरची पावडर टाकल्याची धक्कादायक माहिती दिली. इतकंच नाही तर त्यांना जबरदस्तीने मिरची पावडर खाण्यासदेखील भाग पाडण्यात आलं.

आश्रमशाळेतील लहान मुलींनाही शिक्षा म्हणून भांडी, कपडे धुण्यास तसंच खोल्या आणि शौचालय स्वच्छ करायला लावण्यात आलं. यासोबतच किचनमध्ये पुरेसा स्टाफ नसल्याने त्यांना किचनमधील कामातही जुंपलं होतं. आश्रमशाळेतील 22 मुलींसाठी फक्त एक आचारी असून जेवणाचा दर्जाही उत्तम नसल्याचं महिला आयोगाने म्हटलं आहे.

मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, रुम स्वच्छ न ठेवल्याबद्दल तसंच स्टाफचं ऐकून न घेतल्याबद्दल त्यांनी पट्टीने मारहाण करण्यात आली. सुट्ट्यांमध्येही त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. महिला आयोगाच्या सदस्यांनी ही सर्व माहिती प्रमुख स्वाती मलीवाल यांच्यापर्यंत पोहोचवली. यानंतर रात्री 8 वाजता त्यांनी लगेच आश्रमशाळा गाठली.

स्वाती मलीवाल यांनी द्वारकाच्या पोलीस उपायुक्तांशी संवाद साधला. त्यांनी तात्काळ पोलिसांचं एक पथक पाठवत मुलींचे जबाब नोंद करुन घेतले. दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती महिला आयोगाने दिली आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी 24 तास पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, महिला आयोगाचे सदस्यदेखील आश्रमशाळेत उपस्थित आहेत.