Menu

देश
शाळेच्या ‘चढाई’तच दमछाक

nobanner

जागेअभावी बहुमजली होत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कसरत

जागेअभावी बहुमजली होत असलेल्या शाळा शिक्षणासाठी आकर्षणकेंद्र ठरत असल्या, तरी अशा शाळांतील वरच्या मजल्यांवरील वर्ग गाठतानाच विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. पाठीवर दप्तराचे भलेमोठे ओझे असताना उद्वाहनाची सोय नसल्याने चार-पाच मजले चढण्याची कसरत  करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या उत्साहावरच परिणाम होत आहे.

पाठीवर दप्तराचे ओझे वागवत, धापा टाकत वर्ग गाठणारे विद्यार्थी. हे दृश्य बहुतेक शाळा, महाविद्यालयांमध्ये दिसू लागले आहे. संस्थेकडून उद्वाहक वापरण्यासाठी करण्यात येणारी मनाई हे त्यामागचे कारण आहे. उद्वाहक असतानाही देखभाल-दुरुस्तीसाठी येणारा खर्च, सुरक्षितता, वीजखर्च यामुळे अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना उद्वाहकाचा वापर करू दिला जात नाही. पूर्वी शाळा-महाविद्यालये तीन किंवा फारतर चारमजली असत. परंतु, आता मुंबईत शाळामहाविद्यालयांच्या उंचच उंच इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. बहुतेक शिक्षणसंस्था अपंग विद्यार्थी वगळल्यास इतर विद्यार्थ्यांना उद्वाहन वापरू देत नाहीत. तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरील, काही ठिकाणी अगदी सातव्या, आठव्या मजल्यावरील वर्ग, प्रयोगशाळांत जाण्यासाठीही उद्वाहन वापरू देण्यात येत नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. अनेक शाळांमधील लहान मुलेही याला अपवाद नाहीत.

‘उद्वाहन विद्यार्थ्यांना वापरता येत नाही. विज्ञान शाखेच्या शिकवण्या, प्रात्यक्षिके यांमुळे दिवसभराचे डबा, पाण्याची बाटली, पुस्तके, प्रयोगवह्य़ा असे ओझे सॅकमध्ये असते. अगदी दुपारच्या उन्हातून आल्यावरही जिने चढून चौथ्या माळ्यावरील वर्गात जावे लागते,’ असे शीव येथील महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने सांगितले. ‘उद्वाहने दोनच आहेत. त्यामुळे गर्दी असते.

 उद्वाहनासाठी थांबण्यापेक्षा जिने चढून वर्गात जाण्याचा पर्याय स्वीकारावा लागतो,’ असे माटुंगा येथील विद्यार्थिनीने सांगितले. मुलांना एवढे जिने चढायला लावणे योग्य नसल्याचे मत ठाणे येथील पालक अमिता राणे यांनी व्यक्त केले.

‘विद्यार्थी पाच मजल्यांपर्यंत चढून जाऊ  शकतात. तेवढा व्यायामही गरजेचा असतो,’ असेही मत एका प्राचार्यानी मांडले. याबाबत वझे-केळकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य विद्याधर जोशी यांनी सांगितले, ‘सर्वच महाविद्यालयांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना उद्वाहन वापरण्याची परवानगी दिली जाते. सरसकट परवानगी देण्यासाठी लिफ्टची संख्या वाढवावी लागते, मात्र सर्व महाविद्यालयांत ते शक्य नसते.

या पार्श्वभूमीवर मनसेने कांदिवलीतील एका महाविद्यालयात या प्रश्नावरून आंदोलनही केले. या आंदोलनात पुढाकार घेणारे मनसेचे नेते नयन कदम म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना उद्वाहन वापरण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचेपर्यंतच दमून जातात. अगदी पहिल्या-दुसऱ्या मजल्यासाठी नाही तरी उंच इमारतींमधील वर्गात जाण्यासाठी उद्वाहन वापरण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.’