Menu

देश
सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

nobanner

सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. मंत्री बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून बुधवारी कळवण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘कांदा प्रश्नावर आमची राज ठाकरेंशी चर्चा झाली. हे सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा. तसेच मंत्री बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा’, असे राज ठाकरेंनी सांगितल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आम्हाला मुंबई भेटीचे निमंत्रण दिल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.

राज ठाकरे यांचा नाशिक दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. दिंडोरी येथे राज ठाकरेंना बघण्यासाठी स्थानिक तरुणांनी गर्दी केली होती. गर्दीमुळे राज ठाकरेंना गाडीबाहेर पडताना अडचणीचा सामना करावा लागला. अखेरीस पोलिसांनी हस्तक्षेप करत राज ठाकरेंचा मार्ग मोकळा केला.

दरम्यान, सध्या देशभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा चर्चेत आहे. कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा निम्म्याने पडले असून राज्यातील गंभीर बनत असलेल्या कांदा उत्पादकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. उत्पादन खर्च प्रति क्विंटल १००० रुपये असताना बाजारात कांदा कवडीमोलाने विकला जात आहे. भाव घसरल्याने शेतकरी संतप्त आहे. निफाडमधील संजय साठे यांनी ७५० किलो कांदा विक्रीतून मिळालेले १०६४ रुपये थेट पंतप्रधान कार्यालयास ‘मनिऑर्डर’ करून शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.