Menu

खेल
टीम इंडियाची एका दशकाची प्रतीक्षा फळाला; मालिकेत विजयी आघाडी

nobanner

सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने दिलेलं 244 धावांचं आव्हान भारताने सहज पूर्ण केलं. विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. रोहितने 62 तर कोहलीने 60 धावा केल्या. यानंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक या जोडीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

न्यूझीलंडच्या भूमीवर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला तब्बल एका दशकाची वाट पहावी लागली. 2008-09 साली भारताने न्यूझीलंडमध्ये 3-1 च्या फरकाने वन-डे मालिका जिंकली होती. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 2 तर मिचेल सँटनरने 1 बळी घेतला.

याआधी रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने तिसऱ्या वन-डे सामन्यात 49 षटकात 243 धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी रॉस टेलरने 93 तर टॉम लॅथमने 51 धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. यानंतर कर्णधार केन विल्यमसनने काहीकाळ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला.

यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथम जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. दोघांमध्येही चौथ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी झाल्यानंतर टॉम लॅथम माघारी परतला. यानंतर सावरलेला न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतल्यामुळे भारतीय संघाने सामन्यावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवलं. तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत न्यूझीलंडला 243 धावांचं लक्ष्य गाठून दिलं. भारताकडून मोहम्मद शमीने 3 बळी घेतले, त्याला हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2-2 आणि भुवनेश्वरने 1 बळी घेत चांगली साथ दिली.