Menu

अपराध समाचार
नशीबवान! चौथ्या मजल्यावरच्या खिडकीतून पडूनही १४ महिन्यांचा अथर्व बचावला

nobanner

नशीबाची साथ असेल तर काही जण भीषण आपत्तीतूनही बचावतात. गोवंडी येथे राहणाऱ्या अथर्व बारकाडे या चौदा महिन्याच्या मुलाच्या बाबतीतही अशीच घटना घडली आहे. दैवाची साथ लाभल्यामुळे अथर्व चौथ्या मजल्यावरील खिडकीडून खाली पडूनही आज व्यवस्थित आहे. गुरुवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

गोवंडी पूर्वेला बी.एस.देवाशी रोडवर गोपी कृष्ण इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर बारकाडे कुटुंबाचा फ्लॅट आहे. अथर्वचे वडिल अजित, आई ज्योती, आजोबा, आजी, काका, काकी, चुलत बहिण असे सर्वजण एकत्र राहतात. अथर्वची आजी मंगलने कपडे वाळत घालण्यासाठी म्हणून लिव्हिंग रुममधील स्लायडींग असलेली खिडकी उघडली होती. या खिडकीला ग्रिल बसवलेले नाही. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

सकाळच्या घाईगडबडीत मंगल खिडकी बंद करायला विसरल्या. त्याचवेळी तिथे खेळत असलेला अथर्व खिडकीजवळ गेला. खिडकीतून खाली डोकावत असताना तो खाली पडला असे मंगल यांनी सांगितले. अथर्व खाली पडल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी एकच किंकाळी फोडली व खाली धाव घेतली. अथर्वला कुटुंबियांनी पाहिले तेव्हा तो जमिनीवर पडलेला होता. पण शुद्धीत होता. त्याला सर्व काही समजत होते.

अथर्वला कुटुंबियांनी उचलले तेव्हा त्याने रडायला सुरुवात केली. त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे आवश्यक सुविधा नसल्यामुळे मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अथर्वची प्रकृती आता स्थिर असून इतक्या उंचीवरुन पडूनही त्याला गंभीर इजा झालेली नाही. फक्त ओठ आणि पायाला मार लागला आहे. ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय या चौदा महिन्यांच्या मुलाच्या बाबतीत आला.

अथर्वच्या घराच्या बाजूला एक झाड आहे. अथर्व खाली पडला तेव्हा तो आधी फांदीवर पडला. त्यानंतर तो जमिनीवर आला. फांदीवर पडल्यामुळे खाली कोसळण्याचा वेग मंदावला. अर्थवच्या इमारतीच्या आवारात हे झाड आहे. हे झाड तिथे नसते तर कदाचित यापेक्षा भयंकर घडले असते.