Menu

देश
युतीविरोधात काम करणाऱ्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये

nobanner

अहमदनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत जुंपली असून नगरमधील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मिळालेल्या नोटिसा व त्याला दिलेले उत्तर हा पक्षांतर्गत विषय आहे. त्यात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी लक्ष घालू नये. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत युतीच्या विरोधात काम करुन साटेलोटे करणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचे स्थानिक नेते अनिल राठोड यांना प्रत्युत्तर दिले.

अहमदनगरमध्ये शिवसेनेविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक नेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत भाजपा- राष्ट्रवादी युतीवर टीका केली होती. महापौर निवडणुकीतही आर्थिक तडजोड करुन सत्ता मिळवली, तेच राष्ट्रवादीवाले सेनेला बदनाम करत आहेत,अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.

अनिल राठोड यांना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत युतीच्या विरोधात काम करुन साटेलोटे करणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, त्यांना मंत्रिपदावरुन अकरा महिन्यातच का हाकलले, असा सवाल जगताप यांनी राठोड यांना उद्देशून विचारला.

महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्यांनी कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला होता, महापौरपदासाठी निष्ठावानांऐवजी बाहेरहून आलेल्यांना वारंवार का उमेदवारी दिली जाते, याचा खुलासा व आत्मचिंतन करावे, असा टोला त्यांनी लगावला.

आ. जगताप पुढे म्हणाले की, शिवसेनेला २०१४ च्या निवडणुकीतच राष्ट्रवादीने अंगावर घेऊन पराभूत केले आहे, नगरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, आता घोडा मैदान जवळ आले आहे, त्यावेळीही नगरकर पुन्हा जागा दाखवून देतील. महापौर निवडणुकीतही त्यांनी मतदान होऊ दिले नाही, अन्यथा शिवसेनेचे किती नगरसेवक त्यांच्याबरोबर आहेत, हे स्पष्ट झाले असते. ते उघड होऊ नये, यासाठीच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा बनाव केला, शिवसेनेच्या मंत्र्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर दबाव आणून आम्हाला राजकीयदृष्टय़ा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, त्याची सीआयडी चौकशी होऊनही काहीच सिद्ध झाले नाही, मात्र केडगावमध्ये दोघा जखमींना वेळेवर उपचार मिळू नयेत, यासाठी रुग्णवाहिका, डॉक्टर पोहाचू नयेत यासाठी दगडफेक केली, रास्ता रोको केले, जखमींना वेळीच वैद्यकिय मदत मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचले असते, असा गंभीर आरोपही आ. जगताप यांनी केला.