Menu

देश
काश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल तो मारला जाईल – भारतीय सेनेचा इशारा

nobanner

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जवानांनी १०० तासात ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यानंतर सीआरपीएफ आणि पोलिसांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. लेफ्टिनेंट जनरल केजीएस ढिलौन्न, श्रीनगरचे आयजी एसपी पाणी, सीआरपीएफचे आयजी जुल्फिकार हसन आणि मेजर जनरल मॅथ्यू यावेळी उपस्थित होते. यावेळी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची आर्मी आणि आयएसआयचा हात असल्याचं केजीएस ढिलौन्न यांनी म्हटलं आहे.

लेफ्टिनेंट जनरल केजीएस ढिलौन्न यांनी म्हटलं की, ‘आम्ही गेल्या काही दिवसांपासून जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांवर नजर ठेवून होतो. जैशच्या दहशतवाद्यांनीच पुलवामामध्ये हल्ला केला. त्यानंतर १०० तासातच जैशच्या लीडरला ठार करण्यात आलं. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या महिलांना आवाहन केलं की, त्यांनी आपल्या मुलांना समजवावं. त्यांना सरेंडर करण्यासाठी सांगावं. लष्कराकडे सरेंडर पॉलिसी आहे. आता जर लष्कराच्या विरोधात कोणी बंदुक उचलली तर त्याला ठार केलं जाईल. कोणताही नागरिक जखमी होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न असतो.’

‘जैश कमांडर कामरानला पाकिस्तानी सेनेकडून सूचना दिल्या जात होत्या. कामरान हाच पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. काश्मीरमध्ये अनेक गाजी आले आणि गेले. जैशला आयएसआय कंट्रोल करत आहे. पाकिस्तानची सेना दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करते. नागरिकांच्या सुरक्षेमुळे अनेक जवान शहीद होतात. म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात येतं की, कारवाई सुरु असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा.’

१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशवताद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४३ जवान शहीद झाले होते. त्यानंतर संपूर्ण देशात एकच संताप व्यक्त होत होता. यानंतर लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड कामरान उर्फ गाजी राशिद याला ठार करण्यात आलं होतं. जवानांनी या कारवाईत ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ज्यामध्ये ५ भारतीय जवान शहीद झाले आहेत.