Menu

देश
उपवनकाठी दशक्रिया घाट?

nobanner

पाणथळ संरक्षण समितीने (वेटलॅण्ड) तीव्र आक्षेप नोंदविल्यामुळे उपवन भागात तरंगता रंगमंच आणि दशक्रिया विधी घाट उभारला जाणार नाही, अशी भूमिका घेणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता याप्रकरणी माघार घेतली आहे. या कामांसाठी सल्लागार आणि बुरुजांच्या उभारणीसाठी ठेकेदार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. बुरुजांचा वापर दशक्रिया विधींसाठीच केला जाणार असल्याचे दिसते.

उपवन या निसर्गरम्य ठिकाणी दररोज शेकडो ठाणेकर फेरफटका मारण्यासाठी व व्यायामासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी दशक्रिया विधी घाट उभारण्यास स्थानिक रहिवासी आणि येथे नियमित येणाऱ्या ठाणेकरांचा तीव्र विरोध आहे. या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता लावून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने जयस्वाल यांनी राजकीय दबावापुढे शरणागती पत्करल्याची जाहीर चर्चा सुरू झाली झाली आहे.

उपवन तलावाकाठी २२ कोटी रुपये खर्च करून तरंगता रंगमंच आणि दशक्रिया विधी घाट उभारण्याचा प्रस्ताव मध्यंतरी मांडण्यात आला होता. मात्र, या तलावाचा समावेश पाणथळ जागांमध्ये होण्याची शक्यता विचारात घेऊन आयुक्तांनीच त्याला स्थगिती दिली होती.

असे असताना या कामांसाठी पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यामागे उद्देश काय, असा सवाल पर्यावरणप्रेमी आणि तज्ज्ञांकडून विचारला जात आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्य़ातील १३२ पाणथळ जागांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये ठाणे शहरातील ३४ जागांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपवन तसेच मासुंदा तलावाचा परिसरही या क्षेत्रात मोडतो. यासंबंधीच्या सर्वेक्षणानंतर पुढील काही महिन्यांत पाणथळ जागानिश्चिती होणार असून, त्यासंबंधी अधिसूचनाही काढली जाणार आहे. सर्वेक्षण सुरू असलेल्या जागांवर कोणतेही बांधकाम केले जाऊ नये, असा जिल्हा प्रशासनाचा आग्रह आहे. तरीही महापालिकेने उपवन तलावालगत बुरूज आणि तरंगता रंगमच उभारण्यासाठी मध्यंतरी निविदा काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

उपवन तलावाचे क्षेत्र पाणथळ असल्याचे समितीच्या अहवालात स्पष्ट झाल्यास ही सर्व बांधकामे अशक्य ठरणार आहेत. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी झालेली बांधकामेही पाडावी लागतील. असे असताना महापालिका नव्या कामांसाठी आग्रह का धरत आहे, असा प्रश्न पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या आक्षेपामुळे मध्यंतरी आयुक्त जयस्वाल यांनी या कामास स्थगिती दिली होती. असे असताना सल्लागार तसेच कंत्राटदार नियुक्तीसाठी पुन्हा एकदा निविदा प्रसिद्ध झाल्याने आश्र्चय व्यक्त होत आहे.

दशक्रिया विधी घाट उभारण्यास असलेला विरोध लक्षात घेता कामाचे नाव बदलून बुरूज उभारणी असे करण्यात आले आहे. या बुरुजावर दशक्रिया विधीच केले जातील, असे चित्र आहे. ही चलाखी नेमकी कशासाठी आणि कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंबंधी जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. ते सुट्टीवर आहेत, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

७५ मीटपर्यंत बांधकामास मनाई

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ‘स्पेस अप्लिकेशन सेंटर’ अहमदाबादने केलेल्या सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्ह्य़ात निश्चित करण्यात आलेल्या १३२ पाणथळ जागांमध्ये मासुंदा आणि उपवन तलावांचा समावेश आहे. या ठिकाणांचा विकास आराखडा जाहीर होत नाही तोपर्यंत, या ठिकाणी केले जाणारे काम अनधिकृत ठरणार आहे. न्यायालयाने पाणथळीपासून ७५ मीटर क्षेत्रापर्यंत बांधकाम करण्यात मनाई केली आहे. तरीही बांधकाम करण्यात येणार असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ते थांबविण्याची विनंती करण्यात येईल. त्यानंतरही बांधकाम सुरूच राहिले तर, न्यायालयाचा पर्याय खुला असेल, असे जिल्हा पाणथळ सनियंत्रण समितीच्या सदस्य सीमा हर्डीकर, यांनी सांगितले.