Menu

देश
उस्मानाबादमध्ये ओमराजेंच्या उमेदवारीवरुन वाद, शिवसैनिकांचा विरोध

nobanner

ऐनवेळी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गायकवाड समर्थक शिवसैनिकांनी थेट उध्दव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे. सोमवारपर्यंत ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात यावी, अन्यथा लोकसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील.

शिवसेनेचे काम न करता ओम राजेनिंबाळकर यांना अस्मान दाखविले जाईल अशी टोकाची भूमिका यावेळी शेकडो शिवसैनिकांनी घेतली. व्यासपीठावर बाबाजी भोसले नामक शिवसैनिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, धनंजय मुसांडे, बाजार समितीचे सभापती सुलतान शेठ, शहरप्रमुख बाबुराव शहापुरे, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पणुरे, डॉ. शोभा बोंगरगे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

खासदार गायकवाड यांना डावलल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी उमरगा येथील शांताई मंगल कार्यालयात तडकाफडकी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला लातूर, औसा, बार्शी, उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, लोहारा, निलंगा आदी तालु्नयातील हजारो शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक शिवसैनिक आपल्या संतप्त भावना आक्रमकपणे व्यक्त करीत होता.

उमेदवार ताबडतोब बदला, खासदार गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी द्या अन्यथा सामुहिक राजीनामे दिले जातील, असा सूर प्रत्येकाच्या बोलण्यातून उमटत होता. शिवसैनिकांच्या भावनेची कदर न केल्यास राजेनिंबाळकरांच्या विरोधात प्रचार केला जाईल, अशी ठाम भूमिकाही अनेकांनी जाहीररीत्या यावेळी मांडली. आपल्या संतप्त भावना मातोश्रीवर पोहचविण्याकरिता शिवसैनिक शनिवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

मागील लोकसभा निवडणुकीत अडीच लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेल्या रवींद्र गायकवाड यांना डावलण्यामागे कारण काय, असा ठोक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांचा शिवसैनिकांनी शेलक्या शब्दात यावेळी उध्दार केला. या मेळाव्यास मतदार संघातील अनेक जुने निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांनी जाहीररित्या आपल्या भावना व्यक्त केल्या. रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव हे देखील आवर्जून या मेळाव्यास उपस्थित होते. मात्र खासदार रवींद्र गायकवाड आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मेळाव्याला हजेरी लावली नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा केवळ एक आमदार आहे. तो देखील उमरगा-लोहारा मतदार संघातून विजयी झाला आहे. जेथे शिवसेनेचे सर्वाधिक प्राबल्य आहे, तेथील उमेदवाराला डावलल्यामुळे दोन्ही तालु्क्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जोवर रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी दिली जात नाही, तोवर अर्धनग्न राहणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. तत्काळ अर्धनग्न आंदोलनास सुरूवात देखील केली. गायकवाड यांच्या उमेदवारीचा विचार न केल्यास सेनेचा पराभव निश्चित होणार, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.