Menu

देश
जालन्यात मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ दे!

nobanner

भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांच्या मनोमीलनासाठी युतीच्या संयुक्त मेळाव्यांना सुरुवात झाली असतानाही जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर या दोन नेत्यांमध्येच मनोमीलन झालेले नाही.

जालन्यातील जनमत दानवे यांच्याविरोधात असल्याने भाजपने ही जागा शिवसेनेला सोडावी किंवा भाजप-शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ दे, असा पवित्रा अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर घेतला असून औरंगाबादमध्ये रविवारी होणाऱ्या मेळाव्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत या प्रकरणाचा निकाल लागेल.

शिवसेनेने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय मागील वर्षी घेतल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला बेजार करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकला. फेब्रुवारीत शिवसेनेने निर्णय बदलत भाजपशी युती केली. पण खोतकर यांनी मात्र अद्याप माघार घेतलेली नाही.

भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दानवे आणि खोतकर यांची एकत्रित बैठक घेतली. पण तरीही मनोमीलन झाले नाही. शनिवारी खोतकर यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यातही खोतकर यांनी माघार घेण्याऐवजी ही जागा शिवसेनेने घ्यावी, असा आग्रह धरला.

मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांनी दोन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा करावी. जालन्याची जागा शिवसेना निश्चितपणे जिंकेल हेच त्यांच्या प्रतिसादावरून लक्षात येईल. शिवसेनेची बाजू वरचढ असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. भाजप ही जागा शिवसेनेला सोडणार नसेल तर या जागेवर युतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ दे, असे भाजपला सांगावे अशी विनंती ठाकरे यांच्याकडे केली आहे. पंकजा मुंडे या माझ्याबरोबर मराठवाडय़ातील लोकसभा मतदारसंघांच्या समन्वयक असल्याने त्या मातोश्रीवर आल्या होत्या. आता रविवारी औरंगाबादमध्ये युतीचा संयुक्त मेळावा आहे. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक होईल. त्यात उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे खोतकर यांनी लोकसत्ताला सांगितले.

शिवसेनेने जागा भाजपला सोडल्यास कॉंग्रेसमध्ये जाणार का, यावर अद्याप तसा निर्णय घेतला नसल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले. नसल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.