Menu

देश
पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

nobanner

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. शनिवारी रात्री उशीरा पाकिस्तान आणि भारतीय लष्करामध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. हरी वाकर असं शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. वाकर हे मूळचे राजस्थानमधील रहिवासी होते.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच उल्लंघन झाल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले, मात्र यामध्ये हरी वाकेर गंभीर जखमी झाले होते. वाकेर यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झाला आहे.

मागील 4 दिवसांपासून या परिसरात सुरक्षा यंत्रणांची शोधमोहीम सुरु आहे. दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी संध्याकाळी पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात वाकर गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा आणि शोपियन जिल्ह्य़ात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानी अतिरेक्यांसह तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. शुक्रवारी तीन दहशतवादी ठार झाल्याने राज्यात गेल्या २४ तासांत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. बंदिपोरा जिल्ह्य़ातील हाजिन परिसरामध्ये रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षारक्षकांनी शोपियनमधील इमामसाहिब परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. त्या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्याला सुरक्षारक्षकांनी प्रत्युत्तर दिले.