Menu

अपराध समाचार
अल्पवयीन मुलीची छेड काढणे महागात पडले

nobanner

अल्पवयीन मुलीची छेड काढणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने त्याला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याच बरोबर तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. रुपेश मिनानाथ फडके असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सदर घटना ३१ जानेवारी  २०१७ रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास खांदा कॉलनी खांदेश्वर परीसरात घडली होती. आरोपी रुपेश याने पिडीत अल्पवयीन मुलीला इमारतीच्या तळमजल्यावर बोलवून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विरोधात भा.द.वी. कलम ३५४ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अर्थात पॉस्को कायद्यातील कलम ८ आणि ९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी तपास करून अलिबाग येथील सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. यावेळी सरकारी अभिव्योक्ता म्हणून अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकुण पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पिडीत मुलगी आणि तपासी अंमलदार एस. यु. जाधव यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासकीय अभिव्योक्ता यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य़ धरला, आणि आरोपी रुपेश मिनानाथ फडके यास भादवी. कलम ३५४ आणि पॉस्को कायद्यातील कलम ८ अन्वये दोषी ठरविले. न्यायालयाने रुपेशला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम पिडीत मुलीला देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.